9 ऑगस्ट: कलावती बांदुरकर यांनी दाखविली शेतकरी न्याय यात्रेला हिरवी झेंडी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : खासदार प्रतिभा धानोरकर माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर,युवक, बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने वणी विधानसभा क्षेत्रात शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या यात्रेचा शुभारंभ यवतमाळ जिल्ह्याचे आराध्य दैवत जानामाय कासामाय देवस्थान वनोजा देवी येथून करण्यात आला. राज्य सरकारने व स्थानिक आमदाराने चुकीची माहिती देऊन मतदारांची दिशाभूल केली, त्याची पोलखोल करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वसंत जिनिंग अँड प्रेसिंग चे अध्यक्ष तथा झरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या संकल्पनेतून ही यात्रा काढण्यात आली आहे. 

शेतकरी न्याय यात्रेचे उद्घाटन कलावती बांदुरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांचे हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेती साहित्यावरील जीएसटी रद्द करावा, 60 वर्षावरील शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन आणि सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करावी, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, वणी विधानसभा क्षेत्रातील पिक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ द्यावा, कोळसा खानी व सिमेंट कंपनीमध्ये स्थानिकांना 80 टक्के रोजगार द्यावा, झरी मारेगाव येथे बस स्थानक बांधण्यात यावे, वणी विधानसभा क्षेत्रात मिळणाऱ्या 65 टक्के खनिज विकास निधी या भागातच खर्च करावा, वणी विधानसभा क्षेत्रात कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याची वर्षभरातच दुरावस्था झाली आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी करून कमिशन खोरांवर कठोर कारवाई करावी, वणी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे काम त्वरित सुरू करावे, यासह इतर मागण्यांना घेऊन ही यात्रा काढण्यात आली आहे शेतकरी न्याय यात्रा मारेगाव तालुक्यातील वनोजा,हिवरा,कानडा',पारडी, मार्डी,यासह अनेक गावात न्यायात्रेचे पुष्प गुच्छ देऊन व औक्षवंत करून स्वागत करण्यात आले. यात्रेचे प्रत्येक गावात ढोल ताशाचा गजरात स्वागत करण्यात आले अनेकांनी आपल्या गावची समस्यांची निवेदने मुख्य आयोजक आशिष खुलसंगे यांच्याकडे सोपवली यात्रेत वणी मारेगाव झरी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे.

उद्घाटन सोहळ्याला नरेंद्र पाटील ठाकरे, अरुणाताई खंडाळकर, गौरीशंकर खुराणा, अ‍ॅड.देविदास काळे, महिला जिल्हाध्यक्ष संध्या बोबडे, राजू येलटीवार,ओम ठाकूर, डॉ.मोरेश्वर पावडे, मारोती गौरकार, राजू कासावार, घनश्याम पावडे, अशोक पांडे, संजय खाडे, टिकाराम कोंगरे, अंकुश माफूर, रवी धानोरकर, विजय बोथले, प्रकाश मॅकलवार, निलेश येलटीवार यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post