कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : वरुणराजा ची हजेरी कायम असल्याने निम्न वर्धा धरणात पाण्याची पातळी वाढली असून वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ होऊन नदी काठ च्या गावात पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पुन्हा नदी काठा वरील गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले.
आज दुपार च्या दरम्यान तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तसेच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास सुरु झाल्याने सेलू येथील (300 नागरिक) व भुरकी येथील सर्व गाव खाली करण्यात आले, गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी म्हणून नांदेपेरा जिल्हा परिषद शाळा येथे व उर्वरित सावर्ला येथील महाविद्यालय येथे हलविण्याची तयारी आहे. प्रशासनाच्या वतीने बचाव पथकाचे 15 प्राशिक्षित जवान व 3 बोट तयार ठेवण्यात आल्या आहेत.
कोसारा घाटावरील चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गांवरील संपर्क तुटला आहे. रात्री पर्यंत पाटाळा पुलावरून पुराचे पाणी वाहू शकते त्यामुळे (वणी वरोरा) मार्ग पुन्हा बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुराचे पाणी वाढल्यास इतरही गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
अप्पर वर्धा प्रकल्प मोर्शी, निम्न वर्धा प्रकल्प धानोडी, बेंबळा प्रकल्प बाभुळगाव या धरणातून वर्धा नदीच्या पात्रात पाणी येत असल्याने वर्धा नदी मध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.