बेनेफिशरी प्रा.लि. कोल वॉशरीवर गोवारीवासियांनी काढला मोर्चा

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२ आक्टो.) : विद्युत प्रकल्पांना दर्जेदार कोळसा मिळाल्यास वीज निर्मिती वाढेल व वीज संचांमध्येही बिघाड होण्याचे प्रमाण कमी होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कोल वॉशरी सुरु करण्याला शासनाने अनुमती दिली. तालुक्यात सहा कोल वॉशेरी बंद अवस्थेत होत्या. त्यापैकी त्यावेळची गुप्ता कोलफिल्ड & वॉशेरीज प्रा.लि. या नावाने असलेली व आता महामिनरल मायनिंग & बेनेफिशरी प्रा.लि. असे नामकरण करण्यात आलेली ही एकमेव कोल वॉशरी सर्वप्रथम सुरु झाली. ही कोल वॉशरी सुरु झाल्या पासून विविध कारणांनी ही वॉशरी नेहमी चर्चेत राहिली. विद्युत प्रकल्पाला निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरविण्यापासून तर ओव्हरलोड वाहतूक करण्यापर्यंत ही वॉशरी नेहमी प्रकाश झोतात राहिली असून वॉशरीच्या कार्यप्रणालीवर नेहमी प्रश्न उपस्थित केल्या गेले. आज गोवारी गावकऱ्यांनी निळापुर गावाजवळील महामिनरल मायनिंग & बेनेफिशरी प्रा. लि. या कोल वॉशरीवर मोर्चा काढून वॉशरीचे कामकाज पूर्णतः बंद पाडले. गोवारी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रांगा लागून रस्ता पूर्णतः वाहनांनी वेढला जात असल्याने या गावाकडे दुचाकी व अन्य वाहनांनी जाणाऱ्या नागरिकांची मोठी कोंडी होत आहे. वॉशरी व्यवस्थापकांना वारंवार सांगूनही ते या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने गोवारीवासीयांचा संयमाचा बांध फुटला व आज त्यांनी थेट वॉशरीवर मोर्चा काढून आपला राग व्यक्त केला. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनाही वॉशरीचा महाप्रताप सांगून त्यांना गावकऱ्यांनी वॉशरी जवळ पाचारण केले. या वॉशरीमध्ये भूमिपुत्रांना डावलून परजिल्ह्यातील कर्मचारी नियुक्त करण्यात आले. हा मुद्दाही गाववासीयांनी आमदारांसमोर मांडला. आमदार व वॉशरी प्रशासनाने गोवारी गावातील काही बेरोजगारांना वॉशरीमध्ये रोजगार देण्याचे व रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. 

ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. त्यातल्यात्यात कोळसा वाहतूक करणारी वाहनेही रस्ता अडवून उभी असतात. त्यामुळे रस्त्यानी मार्गक्रमण करणाऱ्यांचा चांगलाच मनःस्ताप होत आहे. कोल वॉशरी सुरु झाल्याने तालुक्यातील बेरोजगारी कमी होईल, ही युवकांना आशा होती. पण पुरेसा रोजगार न मिळता, कोल वॉशरीमुळे मनःस्ताप व त्रासच जास्त सहन करण्याची नागरिकांवर वेळ आली. भूमिपुत्रांना डावलून वॉशरी प्रशासनाने परजिल्ह्यातील युवकांना रोजगाराची संधी दिली. त्रास भूमिपुत्रांनी सहन करायचा व नोकऱ्या परजिल्ह्यातील युवकांनी काबीज करायच्या, हे सहन होण्यापलीकडे गेल्याने आज गोवारीवासियांनी कोल वॉशरी विरुद्ध रणशिंग फुकले. पूर्ण गावचं कोल वॉशरीवर चालून आला व वॉशरीचे कामकाज बंद पाडले. आनदारांनाही आंदोलनस्थळी पाचारण करण्यात आले. आमदारांनी मध्यस्थी करित गोवारीतील काही युवकांना वॉशरीमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले. तसेच रस्त्याची दुरुस्ती करण्याचीही ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलनकारी शांत झाले. वॉशरीचे कामकाज बंद पडल्याने वॉशरी समोर कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रांगाचरांगा लागल्या होत्या. तालुक्यात सध्या महामिनरल मायनिंग & बेनेफिशरी प्रा.लि. व कार्तीके कोल वॉशरीज प्रा.लि. या दोन कोल वॉशरी सुरु झाल्या आहेत. पण तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न मात्र जैसे थे च आहे.