टॉप बातम्या

नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या दोघांचेही सापडले मृतदेह

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०१ संप्टें) : कोसळधार पावसामुळे शेतशिवारा जवळील नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या दोनही व्यक्तींचा मृतदेहच आढळून आल्याने सोनापूर हे छोटेशे गाव हळहळले आहे. गावातील दोन कर्त्या पुरुषांवर अकाली मृत्यू ओढावल्याने अख्ख गाव शोकसागरात बुडालं आहे. एक शेतकरी व एक साल गडी दोघांनाही जल समाधी मिळाली. नागाडा शिवारातील नाल्याला आलेल्या पुरात दोघेही जण वाहून गेले. नाला पार करतांना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. (ता. ३०) ऑगष्टला रात्री उशिरा पर्यंत दोघेही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोधाशोध घेतला. शेतशिवारा जवळ असलेल्या नाल्याला सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात ते वाहून तर गेले नसावे हा संशय आल्याने प्रवाहाच्या दिशेने त्यांचा शोध घेतला असता आज सकाळी शेतकऱ्याचा तर दुपारी सालगड्याचा मृतदेह आढळून आला. 
वणी तालुक्यातील सोनापूर येथिल शेतकरी सतीष मधुकर देठे (४०) हे सकाळी ११ वाजता शेतात जाण्याकरिता घरून बाहेर पडले, ते रात्री उशिरा पर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. त्यांच्या सोबत असलेला राजेंद्र नामदेव उईके (४३) रा. सोनापूर हा त्यांचा साल गडीही घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता आणखीच वाढली. सुरु असलेल्या कोसळधार पावसामुळे शेताजवळील नाल्याला मोठा पूर आल्याने नाला पार करतांना दोघेही वाहून तर गेले नसावे, हा संशय आल्याने नाल्याच्या प्रवाहाच्या दिशेने दोघांचाही शोध घेण्यात आला. रात्री ते कुठेही दिसून न आल्याने दिवसा त्यांचा नाल्याच्या पाण्यातच शोध घेण्यात आला. ३१ ऑगष्टला सकाळी ७.३० वाजता सतिष देठे या शेतकऱ्याचा तर दुपारी ४ वाजता सालगडी असलेल्या राजेंद्र उईके याचा मृतदेह आढळून आला. सतिष देठे हा शेती बरोबरच मालमत्ता विक्रीचीही कामे करायचा. दोघेही विवाहित असून घरातील कर्त्या पुरुषांच्या अशा या अकाली जाण्याने कुटुंबाचा आधारच हिरावला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या मृत्यूने अख्ख गाव हळहळलं आहे. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Previous Post Next Post