Page

अंधश्रद्धेच्या जखडातून अमानुष मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा : चंद्रपूर पुरोगामी पत्रकार संघाची मागणी


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२५ ऑगस्ट) : जिल्ह्यातील अतिदुर्गम, डोंगराळ, निसर्गरम्य जिवती तालुका नेहमी कायम तसा उपेक्षितच!. तालुक्यापासून १२ किमी. अंतरावरील वणी (खु) गावात शनिवार दि.२१/०८/२०२१ ला माणुसकीला आणि पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना घडली. गावात अचानक दोन महिलांच्या अंगात देवी येते आणि काही लोकांनी जादूटोणा,भानामती केल्याची बतावणी करून गावातील ७ लोकांची स्पष्ट नावे घेते,नंतर गाव एकत्र येऊन त्या सातही लोकांचे गावातील चौकात दोरखंडाने हात पाय बांधून,अघोरी प्रकाराला जबाबदार समजून जीवघेणी मारहाण केली.हा सर्व निर्दयी प्रकार सुरू असताना गावातील सभ्य दिसणारी लोक फक्त बघ्याच्या भूमिकेत सर्व निचतेचा कळस बघत होती.
    
इतकी मोठी व भयावह घटना चक्क दोन दिवसानंतर उजेडात येते,नेमके काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतो?जशी घटनेची माहिती मिळाली,दुसऱ्याच क्षणी विदर्भ अध्यक्षांनी जिवती गाठून पीडितांच्या घरी जाऊन ग्राऊंड झिरो ची संपूर्ण हकीकत ऐकली व त्यांच्या मार्गदर्शनात पुरोगामी पत्रकार संघ चंद्रपूरच्या वतीने पीडित कुटुंबियांना संरक्षण आणि आरोपींना कठोरतील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. जिथे कुठे अन्याय अत्याचार होईल तिथे पुरोगामी पत्रकार संघ पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.जो पर्यंत पीडितांना न्याय मिळत नाही तो पर्यंत हा संघर्षाचा लढा असाच सुरू राहील.
  
यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ संघटक निलेश ठाकरे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार,भद्रावती तालुका अध्यक्ष मनोज मोडक,बल्लारपूर तालुका कार्याध्यक्ष शंकर महाकाली,राजुरा तालुका संपर्क प्रमुख अमोल राऊत आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.