Page

न.पं. मुख्याधिकारी व अभियंत्यांची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव, (१४ ऑगस्ट) : शहराचा विकासाच्या नावावर खेळखंडोबा सुरू असून, दरम्यान शहराच्या विविध भागात नागरी सुविधा अंतर्गत रस्त्याच्या कामाचा धडाका सुरू आहे. अशाच एका कामात भ्रष्टाचाराचा कळस गाठलेल्या मुख्याधिकारी व अभियंत्यांची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गजानन चंदनखेडे यांच्या नेतृत्वात सदर निवेदन जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांना देण्यात आले. वरील मागण्या न झाल्यास १५ ऑगस्टपासून घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

नगरपंचायतचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नगरपंचायत कार्यालयात कायम विसावलेल्या कंत्राटदारावर येथील मुख्याधिकारी व अभियंता कमालीचे मेहेरबान होत शहराचा विकासाच्या नावावर खेळखंडोबा सुरू आहे. शहराच्या प्रभाग क्रमांक ८ मधील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे काम थातुरमातुर करून अतिक्रमण धारकांना पाठीशी घालून इष्टीमेट नुसार न करता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप प्रभाग वासीयांचा आहे. त्यामुळे सदर कामाची गुणवत्ता चाचणी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
   
दरम्यान शहराच्या विविध भागात नागरी सुविधा अंतर्गत रस्त्याच्या कामाचा धडाका सुरू आहे. अनेक सिमेंट रस्त्याची अवघ्या दोन तीन महिन्यात चाळणी झाली आहे. त्यामुळे कामात किती पारदर्शकता आहे हे दिसून येत आहे. नगरपंचायत कार्यालयाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरच विकास कामाचा थातुरमातुर धडाक्याने अनेकांच्या भुवया उंचावत आहे.
   
परिणामी नगरपंचायत कार्यालयात पूर्ण वेळ देणाऱ्या कंत्राटदाराने सलगी वाढवत मुख्याधिकारी व अभियंता यांनी आपलेही इप्सित साध्य करीत विकासाच्या नावावर मलिंदा लाटण्याचा गोरखधंदा चालविला असल्याने शहरातील प्रभाग क्रमांक ८ सह इतर प्रभागातील कामाची गुणवत्ता कंट्रोल विभागाकडून चौकशीसाठी येत्या स्वातंत्र्य दिनी नगरपंचायत कार्यालय समोर घंटानाद आंदोलन गजानन चंदनखेडे यांचे नेतृत्वात शब्बीर खान पठाण, मारोती देवाळकर, विनोद बदकी, बंडू मत्ते, दिनेश सरवर, राजू बदकी, मनोज पेंदोर यांचेसह येथील नागरिक करणार आहे. जोपर्यंत मागण्याची पूर्तता होत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा एल्गार येथील स्थानिकांनी पुकारला आहे.