टॉप बातम्या

मा. नामदार. पालकमंत्री- विजयभाऊ वडेट्टीवार यांनी बुध्दभूमीच्या संवर्धनासाठी पांच एकर जमीन उपलब्ध करून द्यावी -राहुल उमरे



सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे 
चंद्रपूर, (६ जुलै) : कोरपना तालुक्यातील गडचांदूरच्या  जोगाई पहाडांच्या पायथ्याशी मौजा व साजा गडचांदूर येथील ऐतिहासिक बुध्दभूमी असलेल्या सर्व्हे नंबर १९२ मधील पाच एकर जमीन ऐतिहासिक बुध्दभूमीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी देण्यात यावी. अशी मागणी वजा विनंती गडचांदूर नगरपरिषदेचे नगरसेवक तथा आरोग्य व स्वच्छता सभापती तसेच अध्यक्ष, भीमसेना बहुउद्देशीय सुधार संस्था, गडचांदूरच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आद. नामदार विजय वडेट्टीवार यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली. 
सर्व्हे नंबर १९२ मध्ये ऐतिहासिक बुध्दभूमी यांचे अवशेष असल्याची नोंद पुरातत्व विभागाकडे आहे. मात्र, या खात्याचे दुर्लक्ष होत असल्याने पुरातन वास्तू, विहारे, मंदिरे यांचे जतन आणि संरक्षणासाठी विहाराचे अवशेष असलेली ५ एकर जमीन संस्थेला उपलब्ध करून देण्यात यावी. 
सदर संस्थेने जमिन उपलब्ध करून देण्यासंदर्भात महसूल विभागाकडे विनंती अर्ज केला असता तलाठी गडचांदूर यांनी सर्व्हे नंबर १९२ चा सात बारा, नमूना ८ आणि नकाशा वरून उपरोक्त जमिन महसूल विभागांची आहे, असे निदर्शनास येते. परंतु वनविभागाने सदर सर्व्हे नंबरची जमिन वन विभागाच्या कक्ष क्र. ३ चा भाग असल्याने सदर जागा या क्षेत्राचा वनोत्तर वाटप केल्यास वन संवर्धन अधिनियम १८० आकृष्ट होत असल्याने सदर जागा संस्थेला देता येत नाही; असे कळविले आहे. मात्र, सदर सर्व्हे नंबर १९२ मध्ये तुळशीराम भीमा सिडाम यांना २ हेक्टर जमीन शेती करण्यासाठी देण्यात आली आहे. असाच विचार करून सार्वजनिक उद्देशाच्या पुर्ती करण्यासाठी भीमसेना बहुउद्देशीय सुधार संस्था, गडचांदूरला देण्यात आल्यास संस्था आपली आभारी राहील. 
गडचांदूरच्या दक्षिणेला व जोगाई पहाडांच्या पायथ्याशी ऐतिहासिक बुध्दभूमीचे काही सुस्थितीत आणि काही भग्न अवशेष इतस्थतः पडलेले आहेत. यांतील काही मुर्त्या लोकांनी आपापल्या परीने नेऊन या परिसरातील मंदिरांचे सौंदर्यकरणात भर घातली आणि काही तथागत बुध्द व अन्य मुर्त्या माणिकगड सिमेंट फॅक्टरीतील गेस्ट हाऊसमध्ये सजविण्यात आल्या आहेत. मुर्त्या नेण्याचे उठसूट असाच प्रकार होत राहील्यास बुध्दभूमीचे ऐतिहासिक महत्त्व आणि अवशेष शिल्लक राहणार नाही. 
सदर संस्था ही मागील सहा वर्षापासून सार्वजनिक क्षेत्रात लोकोपयोगी कार्य करीत आहे. ह्या संस्थेच्या माध्यमातून संविधान सन्मान रॅली, जनजागृती, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, समाज सुधारण्याचे कार्यक्रम राबविणे. रक्तदान शिबिर आयोजित करणे, वन संवर्धनाचे कार्य करणे, वृक्षारोपण करणे इत्यादी आणि असे कार्यक्रम राबविण्यात येत असतात. 
पुरातन विहारे, मंदिरे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सदर संस्थेला पांच एकर जमीन दिल्यास एका सार्वजनिक योग्य कार्याला आमचा नक्कीच हातभार लागेल.
संस्था आपली शतशः आभारी राहील.
Previous Post Next Post