सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (८ जुलै) : बरेच दिवस पावसाने उसंत दिल्यानंतर आज दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. हा पाऊस पिकांना संजीवनी देणारा ठरला असल्याने शेतकरी सुखावला आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. दुबार पेरणीच्या सावटात शेतकरी आला असतांनाच आज पावसाच्या सरी बरसल्या. पण विजांनी अकांड तांडव केल्याने शेतकरी कुटुंबं दुःखाच्या सावटात आलं आहे.शेतातील निवाऱ्यावर वीज कोसळल्याने कास्तकाराला आपला जीव गमवावा लागला. तर शेतात काम करणाऱ्या दोन महिला गंभीर जख्मी झाल्या. वणी उपविभागात आज ढगांच्या गडगडाटासह विजाही कडकडल्या. नुसत्या कडकडल्या नाही तर ठिकठिकाणी कोसळल्या. पावसाच्या सुखावण्याला विज कोसळण्याच्या दुःखानं गालबोट लागलं. पाळीव प्राण्यांचा तडफडाहट झाला. २६ शेळ्या व दोन धडधाकट बैलांचा बळी गेला. ऐन शेतीच्या हंगामात बैलांचा नाहक बळी गेल्यानं शेतकऱ्यावर चांगलच संकट कोसळलं आहे.
खूप दिवसाच्या विश्रांतीनंतर आज ७ जुलैला दुपारी तीन वाजता विजेच्या कडकडाटासह पावसाने वणी शहरासह तालुक्यात हजेरी लावली. पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पावसाने दडी मारल्याने बिज करपायला लागली होती. तर पिकं सुकायला लागली होती. आज पडलेला पाऊस शेत पिकांसाठी महत्वपूर्ण ठरला. आज पाडलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेवर मलम लावण्याचं काम केलं आहे. तर वातावरणात निर्माण झालेल्या उकिरड्याला या पावसाने थंडगार केलं आहे. पाऊस आल्याने प्रत्येक जीव सुखावला असला तरी विज कोसळून जीवही गेल्याने मने दुखावलीही आहेत.
शेतातील कामे करत असतांना अचानक ढग दाटून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी शंकर गणपत लोणबळे (३८) रा. वरझडी (देवी), सूचिता मारोती काळे (५०) व पिगलाबाई लोणबळे यांनी शेतातील निवाऱ्याचा आसरा घेतला. नेमकी त्याच निवाऱ्यावर विज कोसळली. यात होरपळून शंकर लोणबळे यांचा दुर्दैवी अंत झाला. तर सुचिता काळे व पिगळाबाई लोणबळे या दोघी जणी गंभीर जख्मी झाल्या. त्यांच्यावर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. गणपत लोणबळे या शेतकऱ्याच्या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. याच विजांनी २६ शेळ्या व दोन बैलांचाही बळी घेतला आहे.
झरी तालुक्यातील खातेरा शिवारात चरत असलेल्या शेळ्यांवर अचानक विज कोसळली. यात २६ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर इंदिराग्राम (बंदरपोड) येथील शेतकरी वासुदेव गणपत आत्राम यांची बैलजोडी विज कोसळून ठार झाली. नैसर्गिक आपत्तीमुळे एक शेतकरी व पाळीव प्राण्यांची जिवं गेली. आजचा पाऊस सुखावणारा ठरला असला तरी विजा कोसळून गेलेल्या जिवांचं दुःखं सहज पचवता येण्यासारखं नाही.