सह्याद्री न्यूज : प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.१६) : तालुक्यात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली असून कधी रुग्ण आढळतात तर कधी रुग्णच आढळत नसल्याने परिस्थिती अद्यापही नियंत्रणातच असल्याचे दिसून येत आहे. तालुका पूर्णतः अनलॉक झाला असून वेळेची मर्यादाही हटविण्यात आली आहे. दैनंदिन कामकाज व व्यवहार सुरळीत सुरु असून नागरिकांच्या संचारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध राहिलेले नाही. बाजारपेठ पूर्वी सारखी खुली झाली असून लग्नसमारंभ व घरगुती सोहळ्यांना परवानगी देण्यात आली आहे. लग्न वरातीत आता बॅण्डबाजाचा आवाजही निनादू लागला आहे. वाजतगाजत वराती मंगलकार्यालया पर्यंत जाऊ लागल्या आहेत. आप्तेष्टांच्या उपस्थितीत लग्न समारंभही होऊ लागले आहेत. कोरोनाचा नागरिकांना जवळपास विसर पडला असून काहींनी तर चेहऱ्यावर मास्क लावणेच बंद केले आहे. शहर तालुक्यात अशीच मोकळीक हवी असेल तर कोरोना परत वाढणार नाही याची नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे.
कोरोना संक्रमणाला चालना मिळू नये, याची दक्षता घेणे ही सर्वस्वी नागरिकांची जबाबदारी आहे. तालुक्यात परत निर्बंध लागू नये असे वाटत असेल तर कोरोनाचे नियम पाळणे तेवढेच जरुरी आहे. काल १५ जूनला तालुक्यात दोन रुग्ण आढळले होते तर आज एकही रुग्ण आढळलेला नाही. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी तर कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आता तालुक्यात केवळ ११ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उरले आहेत.
तालुक्यात नाहीच्या बरोबर कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने कोरोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आहे. १ ते १६ जून या सोळा दिवसांत मात्र ३५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्याचा पॉझिटिव्हिटी दर अत्यंत कमी आहे. आता केवळ ११ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण राहिले आहेत. कोविड केयर सेंटरला २, होम आयसोलेशनमध्ये ६ तर यवतमाळ व इतरत्र ३ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुका कोरोनामुक्त होण्याच्या अगदीच निकट आहे. त्याकरिता नागरिकांनी सावधानी बाळगण्याची आवश्यक्ता आहे.
कोरोनाची साखळी तोडण्याकरिता प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले आहे. त्यांचे हे प्रयत्न व्यर्थ जाणार नाही, याची काळजी नागरिकांना घ्यावी लागणार आहे. परत नियम बंधन लावण्याची वेळ येऊ नये याकरिता नागरिकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. काल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये विठ्ठलवाडी येथील एक तर वडकी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.