सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
चंद्रपूर : पारधी समाजातील अनेक कुटुंबांकडे जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, शिधापत्रिका यांसारखी आवश्यक कागदपत्रे नसल्याने ते विविध शासकीय योजनांपासून वंचित राहतात. ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून या समाजबांधवांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. वरोरा तालुक्यातील पिपरबोडी पारधी टोला (चिनोरा) येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ व पारधी समाज मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत,सरपंच श्रीमती परचाके यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील २२ पारधी बेड्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यात येणार असून, प्रत्येक बेड्याचे सर्वेक्षण करून कोणत्या कुटुंबाला कोणत्या योजनेची आवश्यकता आहे, कोणती कागदपत्रे उपलब्ध नाहीत, याची माहिती संकलित करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी क्रांतिवीर समशेर सिंह पारधी यांच्या नावाने विशेष पॅकेज जाहीर करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल, अशी माहितीही डॉ. उईके यांनी दिली. तसेच पारधी समाजाकडे पाहण्याचा पोलिसांचा दृष्टिकोन सकारात्मक असावा आणि शिक्षणाबाबत व्यापक जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सेवा संकल्प अभियानाचा लाभ घ्यावा:आमदार करण देवतळे यांनी शासनाच्या विविध योजना गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. परिसरातील कंपन्यांच्या CSR निधीतून पिण्याचे पाणी, रस्ते, नाल्या व इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विविध शासकीय विभागांच्या सेवा व माहिती स्टॉलची पाहणी करण्यात आली. यावेळी पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

