सह्याद्री चौफेर | किरण घाटे
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बरडकिन्ही व आक्सापूर परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शेतात काम सुरू असताना अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान वीज कोसळल्याने काही महिला जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून बरडकिन्ही येथील जखमी मनीषा गोकुळदास ठाकरे वय 19 या मुलीला ब्रह्मपुरीतील खासगी आस्था रुग्णालयात, व अन्य जखमी सुभाष मारोती तलमले वय 45,कविता कमलाकर पाकडे वय 50 , इंदू सुभाष तलमले वय 42, मेघा राकेश शेंडे वय 28 यांना आरमोरी येथील सरकारी रुग्णालयात तर आक्सापूर येथील तीर्था गजानन गेडाम वय 40 , विद्या विनोद वरखडे वय 38, शीला माणिक कन्नाके वय 30 या जखमी महिलांना ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांनी तातडीने ब्रम्हपुरी व आरमोरी येथील तिन्ही रुग्णालयांना भेट दिली. यावेळी त्यांनी जखमींच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करून त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला.
संकटकाळात मदतीचा हात
या प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत कॉ.विनोद झोडगे यांच्या वतीने जखमींच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करण्यात आली. तसेच उपचारादरम्यान आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शविली.
विनोद झोडगे यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून जखमींना तातडीने आवश्यक व योग्य उपचार मिळावेत, याबाबत सूचना केल्या. तसेच या घटनेत शासनाकडून मिळणारी मदत जखमी कुटुंबीयांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या वेळी प्रशांत डांगे, गोलू दरवे, मिथुन राऊत, उपसरपंच तलमले जखमी महिलांचे नातेवाईक उपस्थित होते.

