टॉप बातम्या

"स्मशानभूमी द्या, नाहीतर गुन्हे मागे घ्या": बोरीखुर्द ग्रामस्थांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

मारेगाव : बोरीखुर्द येथील स्मशानभूमीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता अधिकच चिघळला असून, ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 

स्मशानभूमी व तेथे जाण्यासाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त नागरिकांनी काही दिवसांपूर्वी मृतदेहावर थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर संबंधित चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, "स्मशानभूमी द्या, अन्यथा दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्या," असा स्पष्ट इशारा त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

बोरीखुर्द, धामणी आणि भालेवाडी या गटग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बोरीखुर्द गावात सुमारे ४५० लोकसंख्या असूनही आजपर्यंत अधिकृत स्मशानभूमीची व्यवस्था झालेली नाही. सध्या वनजमिनीवर अंत्यसंस्कार केले जात असले तरी पावसाळ्यात तेथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, न्याय्य मागणीसाठी केलेल्या आंदोलनाचे रूपांतर गुन्ह्यात झाल्याने संताप अधिकच वाढला आहे. 

प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रादेशिक वन विभागाने स्मशानभूमीसाठी आवश्यक प्रक्रिया पुढे नेण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उपवन रक्षकांनी गटविकास अधिकारी, मारेगाव यांना पेसा अंतर्गत आवश्यक प्रस्ताव, हमीपत्र व अधिसूचनेची प्रत सादर करण्याबाबत पत्र पाठविले आहे. 

त्यामुळे दीर्घकाळ रखडलेल्या स्मशानभूमीच्या प्रश्नावर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ग्रामस्थांच्या मागणीला अखेर प्रशासकीय स्तरावर प्रतिसाद मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();