सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मिळालेल्या माहितीनुसार, मानकी येथील गणेश मारोती कुत्तरमारे यांच्या घरी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस सिलिंडरजवळ भडका उडाला. इंडेन गॅस सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. सिलिंडरचा स्फोट होण्याची भीती निर्माण झाल्याने कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखत तात्काळ घराबाहेर धाव घेत स्वतःचा जीव वाचवला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत घरातील कपडे, संसारोपयोगी साहित्य, लाकूडफाटा, टिनपत्रे तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्या. आग विझविण्याच्या प्रयत्नात गणेश कुत्तरमारे व त्यांच्या पत्नीला किरकोळ भाजल्याची माहिती आहे.
या आगीत गणेश कुत्तरमारे यांचे अंदाजे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच गॅस गळतीचे नेमके कारण तपासून संबंधितांकडून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


