सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वरोरा : पद्मालय नगर परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून करण्यात आली. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या व वंदना घेण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष्यमान मेश्राम यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रंग श्याम मोडक यांनी आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकर यांचे भारतीय संविधानातील योगदान व त्यांच्या विचारांची सखोल मांडणी केली. तसेच डॉ. अंबादे व आयुष्यमान गोवर्धन सर यांनी बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय पुरुषोत्तमजी फुललेले होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची व जागतिक स्तरावरील त्यांच्या कर्तृत्वाची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे संचालन आयुष्यमान हरिभाऊ दारुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयुष्यमान विठ्ठलराव काळे यांनी मानले.
या कार्यक्रमाला पद्मालय नगर, साकार नगर तसेच सद्गुरु नगर येथील महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.