सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
चंद्रपूर : राजमाता राणी हिराई जयंती उत्सवाच्या शासकीय कार्यक्रमात झालेल्या गोंधळामुळे आदिवासी समाजाची प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याचा आरोप करत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे,अशा आशयचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
प्राप्त निवेदनानुसार, सदर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याची जबाबदारी महानगरपालिका चंद्रपूर व आदिवासी विकास विभाग यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या प्रसंगी जिल्ह्यातील निवडक आदिवासी समाजसेवक व विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमस्थळी बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याने निमंत्रित मान्यवरांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. यावेळी काही कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तसेच, कार्यक्रमाच्या मंचावरही राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. राष्ट्रगीत व राज्यगीताचा वारंवार अपमान झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. कार्यक्रमाचे स्वरूप पाहता, काही नगरसेवकांना खूश करण्यासाठीच हा उत्सव आयोजित करण्यात आला की काय, अशी भावना उपस्थितांमध्ये निर्माण झाली.
या संपूर्ण प्रकारामुळे गावखेड्यातून आलेल्या आदिवासी बांधवांना त्रास सहन करावा लागला, तसेच त्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली. या घटनेमुळे समाजात चुकीचा संदेश गेला असून आदिवासी समाजाच्या कार्यक्रमांबाबत नकारात्मक चर्चा सुरू झाल्याचेही निवेदनात नमूद आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आदिवासी टायगर सेना (ATS) च्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे संतोष कुळमेथे, मिनल आत्राम, हितेश मडावी, मोनिका मडावी, पुजा कूरसंगे, सुमित्रा आलाम, संगीता येरकाडे, वर्षा आत्राम, सोज्वळ कुमरे, रेखा सोरते, अविनाश मडावी, वर्षा आत्राम, हरिप्रसाद गेडाम सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

