शासनाला चुना लावणाऱ्या त्या मंडळ अधिकारी व तलाठ्यांना निलंबित करा - उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : तालुक्यातील झोला घाटातून मोठ्या प्रमाणात रेती चा उपसा झाला, लिलाव नसताना घाट पोखरला गेला,ही रेती चोरी हात ओले झाल्याशिवाय होऊ शकत नाही. असा आरोप युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी निवेदनातून करत जिल्हाधिकारी यांना त्या साज्यातील तलाठी व संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. 
वणी तालुक्यातील बोरगाव अहेरी, शिंदोला परिसर व झोला घाट रेती तस्करीसाठी कुपरिचित आहे. येथून रेती मोठ्या प्रमाणात अवैध उपसा होतो. अशातच दि. 6 एप्रिल रोजी तहसीलदार धुळधर यांनी झोला घाटात धाड मारून एक हायवा व पोकलॅन्ड मशीन जप्त केली, परंतु ही कारवाई थातूर मातुर केल्याचा शेंडे यांचा आरोप असून लाभार्थ्यांना रेती न मिळता वणी तालुक्यात रेती तस्करी होत असल्याची उघड झाले आहे. या घाटात रात्रंदिवस रेती चोरून नेली जात असताना संबंधित मंडळ अधिकारी तलाठी चीरनिद्रेत का? असा प्रश्न अजिंक्य शेंडे यांनी उपस्थित केला आहे.
शासनाचा करोडो चा महसूल बुडवणारे हे मंडळ अधिकारी, तलाठी यांना तत्काळ निलंबित करा अशी एका पत्राद्वारे त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा मागणी केली आहे. पुढे निवेदनात असेही म्हटलं की,रेती तस्करावर कारवाई, त्या साज्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना तत्काळ निलंबित करावे, या प्रमुख मागणी सह जर योग्य कारवाई झाली नाही तर, येत्या काही दिवसात लोकशाही मार्गाने उपोषणास बसाव लागेल असा ईशारा सुद्धा निवेदनात नमूद केला आहे. तसेच याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्याचे युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी सांगितले.

त्यामुळे आता ह्या सर्व बाबीवर वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे वणी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.