Top News

अलोट गर्दी च्या साक्षीने संजय खाडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आज बुधवारी संजय खाडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. श्री रंगनाथ स्वामी मंदिरात दर्शन करून संजय खाडे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. तर भांदेवाडा येथील विदेही सदगुरू श्री जगन्नाथ महाराज संस्थान भांदेवाडा येथे दर्शन घेऊन ग्रामीण भागातील प्रचाराचा शुभारंभ केला. माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यासह नरेंद्र ठाकरे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. प्रचाराच्या शुभारंभानंतर रंगनाथ स्वामी मंदिर ते जैताई मंदिर असा पायदळ मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये हजारो समर्थकांनी सहभाग घेतला. या मार्चने वणीकरांचे लक्ष वेधले. यावेळी समर्थकांनी जोरदार नारेबाजी करीत मार्चमध्ये जल्लोषाचे वातावरण तयार केले. 

सकाळी 10.30 वाजता संजय खाडे यांनी रंगनाथ स्वामी मंदिरात पूजा करीत प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर पायदळ मार्चला सुरुवात झाली. यावेळी समर्थकांनी वाजवलेल्या शिट्टीने वणीकरांचे लक्ष वेधले. दु. जैताई मंदिर येथे मार्चची सांगता झाली. त्यानंतर भांदेवाडा येथे संपूर्ण ताफा रवाना झाला. भांदेवाडा येथील विदेही सदगुरू श्री जगन्नाथ महाराज संस्थान येथे संजय खाडे यांनी नारळ फोडून ग्रामीण भागातील प्रचाराचा शुभारंभ झाल्याचे जाहिर केले.  
विधानसभेत वाजणार शिट्टी 
माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर गावखेड्यातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अनेक सामाजिक संघटना, संस्था मला पाठिंबा देत आहेत. काँग्रेसचे जवळपास अर्धे अधिक कार्यकर्ते व नेते यांनी मला पाठिंबा दिला आहे. आजच्या रॅलीत देखील मोठ्या प्रमाणात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक शिवसैनिकही रॅलीत सहभागी होते. हा पाठिंबा पाहून यंदा वणी विधानसभा क्षेत्रात शिट्टी वाजणार हे नक्की आहे. 
- संजय खाडे, अपक्ष उमेदवार 
भांदेवाडानंतर संजय खाडे व समर्थकांनी वनोजा देवी, घोगुलधरा, वेगाव, वरझडी येथे जाऊन दर्शन घेतले. दरम्यान या मार्गावरील गावांना ताफ्याने भेट देत नागरिकांशी संवाद साधला. शुभारंभ कार्यक्रमाला गौरीशंकर खुराणा, प्रमोद वासेकर, राजाभाऊ पाथ्रडकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच विश्वास नांदेकर यांचे समर्थक उपस्थित होते. मार्चमध्ये महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता.

Previous Post Next Post