वणी : तालुक्यात लाईम स्टोन साठी प्रसिद्ध असलेल्या राजूर (कॉलरी) येथील एका अकरा वर्षीय बालिकेचा डेंग्यू सदृश्य आजाराने बळी गेला असून चंद्रपूर येथे उपचारादरम्यान तिचा आज मृत्यू झाला आहे. तीच्या अशा निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
श्रद्धा संजय जोगदंडे (११) रा. राजूर वार्ड क्रं.५ असे बालिकेचे नाव आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू या आजाराने डोके वर काढले असून या दोन महिन्यात जास्तच आजारबाबत चर्चा असून वणी तालुक्यातील राजूर येथे अनेक डेंग्यू सदृश्य रूग्ण आढळून आले. परंतु स्थानिक पातळीवरील पुरेसा उपचाराअभावी त्यांना इलाज हा खासगी रुग्णालयात करावा लागत असून तो न परवडणारा असल्याचे बोलल्या जात आहे.
संजय जोगदंडे हा रोज मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा असल्यामुळे त्याच्या पत्नीने मुलीला पाच दिवसापासून ताप येत असल्याने वणी ग्रामीण रुग्णालयात नेले परंतु तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला चंद्रपूर येथे शासकीय रुग्णालय येथे हलविण्यात आले होते. चंद्रपूर येथे उपचार घेत असताना आज दि.१८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास डेंग्यू सदृश्य च्या आजाराने श्रद्धा चे निधन झाले,तीची पाच दिवस मृत्यशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली.
या घटनेमुळे जोगदंडे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले. यापुढे अशा घटना घडू नये व डेंग्यू सदृश्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून व स्थानिक ग्रामपंचायत पातळीवर उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.