सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुण गोहोकार यांच्या नेतृत्वात गुरुवारी 15 ऑगस्ट,स्वातंत्र्य दिनी "रस्ता जाम आंदोलन" करण्यात येणार आहे. अशा आशयाचे निवेदन वणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना आज (ता.13) रोजी देण्यात आले.
तालुक्यातील शिंदोला ते मुंगोली या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील धुळ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना बाधा पोहचवत आहे. अक्षरशः शेतमाल पूर्ण खराब होत आहे. अशी त्यांची तक्रार आहे. यासंदर्भात वेकोली ला 12/7/2024 रोजी पत्र देण्यात आले, त्यात रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्यावर सतत टँकरने पाणी मारून रस्ता ओला ठेवावा अशी मागणी करण्यात आली होती, असे 'सह्याद्री चौफेर'ला बोलताना तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सांगितले. मात्र,असे न करता मुजोर वेकोलीने वाहतूक चालविण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे संपूर्ण उडत असलेली धुळ शेतमालाला खराब करत असल्यामुळे वेकोली तसेच संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संपूर्ण गावकरी,पीडित शेतकऱ्यांना सोबत घेऊन येत्या 15 ऑगस्ट ला बेमुदत रस्ता जाम आंदोलन करण्याचा पवित्रा घेतल्याचे ते म्हणाले.
या दरम्यान, कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासनाची जबाबदारी असेल,असा गर्भीत इशाराही नमूद आहे. निवेदन देताना तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, धिरज पिदूरकर, विलन बोधाळकर, साई उगे, संदीप गोवारदीपे, गजानन थेरे, अभय वनकर, मनोज भलमे, धीरज बघवा, सुरज काकडे, सुरज गावंडे आदींची उपस्थिती होती.