तरुण प्रेमी युगुलाने मृत्यूला कवटाळले


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

झरी : प्रेमात एकत्र जगण्याचे आणि मरण्याचे वचन दिलेल्या या जोडप्याने प्रेम पूर्ण होत नसल्याचे पाहून मृत्यूला कवटाळले. हे प्रकरण झरी (जामणी) तालुक्यातील आहे. प्रियकर आणि प्रेयसीचे कुटुंबीय प्रेमाच्या विरोधात असल्यामुळे त्या दोघांनी प्रेम विवंचनेतून एकत्र येत आत्महत्या केल्याची घटना 5 ऑक्टोबर ला सकाळी माथार्जून जवळील वडगाव शिवारातील उघडकीस आली.

कोडपाखिंडी येथे एका विवाहित जोडप्याने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांनाच आज तरुण जोडप्याने एकाच झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. प्रेमी युगुलांच्या एका पाठोपाठ घडलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी झरी तालुक्यासह वणी उपविभागीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

रोहित मदन मेश्राम (23) व रंजना नंदू टेकाम (19) असे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या जोडप्याचे नावं आहे. मृत्यूला कवटाळलेल्या या दोघांचे एकमेकांवर असीम प्रेम होतं. मात्र त्यांच्या प्रेमाला कुटुंबीयांनी विरोध केल्यास त्यांना दुरावा सहन होणारे नव्हते. त्यामुळे त्या दोघांनी मृत्यूला कवटाळले.

रोहित आणि रंजना हे दोघेही माथार्जुन जवळील वडगाव परीसरातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. प्रेमात एकत्र जगण्याचे आणि मरण्याचे वचन दिलेल्या या जोडप्याने प्रेम पूर्ण होत नसल्याने जगाचा निरोप घेतला असावा, असा कयास आहे. त्यांनी असा एकदम टोकाचा निर्णय घेतल्याने दोनही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाटण पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांचे मार्गदर्शाखाली जमादार संदीप सोयाम, सचिन गाडगे, रतिष वानखडे करीत आहे.