टॉप बातम्या

खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर अनंतात विलीन

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे दिवंगत लोकप्रिय खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना त्यांचे मंगळवारी दुःखद निधन झाले होते. शासनाच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर लोकसभेच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार मुकुल वासनीक व आमदार सर्वश्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन राऊत, सुनिल केदार, अनिल देशमुख, आशिष देशमुख, किशोर जोरगेवार आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आपल्या शोकभावना व्यक्त करताना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरचे युवा लोकनेते खासदार बाळू धानोरकर सर्वसामान्याच्या प्रश्नाला भिडणारे नेते होते. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आक्रमकपणे काम केले. आपसात चांगला संवाद असलेल्या या नेत्याचे अकाली निधन हे दु:खद व वेदनादायी असून यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. ते आपल्याला सोडून गेले याचे सर्वांच्या मनात प्रचंड दुःख आहे. धानोरकर परिवाराच्या दु:खात आपण सहभागी असून त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना इश्वरचरणी करत असल्यांचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
दिवंगत खासदार धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी बाळु धानोरकर यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी हानी झाली असून चंद्रपुरच्या या ढाण्या वाघाला, दिलदार व्यक्तमत्व व लढवय्या नेत्याला मानाचा मुजरा करत असल्याच्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी संपूर्ण शासकीय इतमामात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज धानोरकर परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी दिवंगत खा. धानोरकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, तसेच सामाजिक व राजकीय पदाधिकारी नरेशबाबू पुगलिया, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, रामु तिवारी, प्रकाश देवतळे, देवराव भोंगळे यांच्यासह राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील नागरीकांनी पुष्पचक्र अर्पण केले. दरम्यान त्यांच्या अंतयात्रेला हजारोंच्या संख्यने नागरिक उपस्थित होते.


Previous Post Next Post