सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. प्रचारासाठी कमी दिवस उरल्याने उमेदवारांची दमछाक होत आहे. परिणामी सरपंचपदासाठी चांगलीच चुरस वाढल्याने गावकारभाराच्या प्रचाराला वेग आला असून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी 'रात्रीस खेळ' चालत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील वेगांव, कोसारा, मार्डी, हिवरी, वनोजा, नवरगाव, कानडा, शिवणी, गौराळा, ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चिन्ह वाटप झाल्यानंतर गावागावातील चौकात पोस्टर, बॅनरबाजीची स्पर्धा सुरु आहे. सोशल मीडिया वर पोस्टर बॅनर व प्रचार गिते, वायरल करून 'मीच कसा योग्य उमेदवार आहे', असे दाखविण्याचे प्रचार कार्य जोरात आहे.
"कुठे तिहेरी तर कुठे चौरंगी रंगतेय लढत"
शेवटच्या टप्प्यात प्रचार वाढल्याने सरपंचपद मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे. अनेक गावात तिरंगी चौरंगी लढत होत आहे. त्यामुळे नेमकी बाजू कोण मारणार याचा अंदाज जानकारासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कोणता उमेदवार कसा सरस ठरू शकतो, याची गणितं मांडली जात आहे. अनेक ग्रामपंचायतींत स्थानिक आघाड्या झाल्या असल्या तरी त्याला राजकीय बळ असल्याने या निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या मागे ग्रामीण मतदार उभा राहतो, याकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. सरपंचाच्या थेट लढतीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे.
"उमेदवार मागताहेत आशीर्वाद"
होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार मतदाराचे आशीर्वाद मागत आहे. प्रत्येक मतदाराच्या "डोअर टू डोअर" जावून जेष्ठ नागरिकांसह युवामतदारांनाही आपल्यालाच मतदान करण्याची विनंती करत आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत त्यांचे प्रचार कार्य सुरू राहत असल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे.