सह्याद्री चौफेर : प्रतिनिधी
मारेगाव : वणी तालुक्यात वाघाने धुमाकूळ घातला असताना आता मारेगाव तालुक्यात वाघाने मोर्चा वळल्याचे दिसून येत आहे. दुपारी 2 वाजता च्या दरम्यान, बेड्या जवळील शेतात वाघ पाणी पिताना दिसला.
शेत शिवारात वाघाचे वावर हे नित्याचेच. परंतु गावालगत वाघ म्हटलं की, अंगावरचे काटे उभे होतात. आधीच जनता नरभक्षी वाघाच्या दर्शनाने भयभीत आहे. आज मार्डी परिसरातील बोदाड येथील बेड्या जवळ अचानक वाघ दिसला अशी चर्चा आहे. चक्क शेतात पाणी पिताना हा वाघ दृष्टीस पडल्याने मार्डी परिसरात चांगलीच घाबरगुंडी उडाली.
बेड्यालगत असलेल्या शेतात बारू पवार ह्यांना वाघ शेतात पाणी पीत असतांना दृष्टीस पडला, अचानक वाघ दिसताच त्यांनी स्वतःला सावरत लपून वाघाला पाहू लागले. दरम्यान वाघाच्या पाऊलखुणा त्यांच्या शेतात दिसून येत असून धावा धावा वाघ आला, अशीच काही भीती निर्माण झाली आहे.
वाघ आल्याची चर्चा पसरताच शिवारातील मजूरदार गावाच्या दिशेने निघून आल्याची चर्चा असून वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.