चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : तालुक्यातील बोरीअरब येथील अडाण नदीवर तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी पूल तयार करण्यात आला.मात्र या पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे.तसेच या मार्गावरील वाहतूक बंद पडल्यास पर्यायी मार्ग नेरमार्गे दारव्हा हा आहे. मात्र नेर - दारव्हा मार्गावरील डोल्हारी येथील पुलावरूनही पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.अत्यंत वर्दळीचा तसेच महत्वाचा असलेला हा मार्ग बंद पडल्याने प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
अडाण नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे.या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी करणे अपेक्षित होते.मात्र संबंधित विभागाला याची कल्पना असतानाही कॉन्ट्रॅक्टर वर कुठलीही कार्यवाही न करता पाठराखण केली जाते आहे.तर दुसरीकडे यवतमाळचे आ.मदन येरावार व दिग्रस चे आ.संजय राठोड या लोकप्रतिनिधींचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसते.या पुलाचे अपूर्ण असलेल्या कामामुळे तात्पुरत्या स्वरूपाचा पूल बांधण्यात आला आहे.नदीला पूर आल्यास हा पूल वाहून जाण्याची शक्यता आहे.सद्यस्थितीत या पुलावरून पाणी वाहत असून नागपूर,नांदेड या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे.
प्रशासनाने त्वरित कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारावर कार्यवाही करावी. अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ईश्वर राठोड यांनी दिला आहे.