Page

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाणदिना निमित्त करण्यात आले अभिवादन

सह्याद्री न्यूज : प्रशांत चंदनखेडे 

वणी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाणदिना निमित्त शहरात ठिकठिकाणी या महामानवाला अभिवादन करण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्यांना अभिवादन करण्याकरिता अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. त्यांच्या महापरिनिर्वाणदिनाचे औचित्य साधून अनेक मान्यवरांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. अनेक नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाणदिना निमित्त आदरांजली वाहिली. रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळही महापरिनिर्वाणदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती रेल्वे स्टेशन वणी व मध्यरेल्वे कर्मचारी रेल्वे स्टेशन वणी यांच्या विद्यमाने आयोजित या अभिवादन सोहळ्याला रेल्वे कॉलनी, विठ्ठलवाडी व गौरकार कॉलनी येथील रहिवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. 

विषमतेच्या अंधकारातून समानतेच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या प्रज्ञासुर्याचा ६ डिसेंबर १९५६ ला अस्त झाला असला तरी त्यांनी पेरलेल्या विचारांचा कधीच अंत होऊ शकणार नाही. त्यांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी केलेले कार्य व समाजाला आधुनिकतेचा दाखविलेला मार्ग प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून देणारा ठरला. त्यांचे उच्चकोटीचे विचार समाजासाठी नेहमी प्रेरणादायक ठरले आहेत. त्यांनी देशात लोकतंत्र निर्माणाची संकल्पना मांडून देशासाठी लिहिलेली राज्यघटना विश्व उल्लेखनीय ठरली. देशाला एकसंघ ठेवण्याकरिता राज्यघटना बहाल करून देश प्रजासत्ताक केला. विद्येचा तो महासागर होता. आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी अनिष्ट विचारसरणीवर प्रखर प्रहार केला. मानवी समानतेचा विडा उचलून माणसाला माणसाच्याच गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता समानतेची चळवळ उभारणाऱ्या क्रांतिसूर्याची थोरवी सांगतांना शब्दही कमी पडतात, असे मनोगत यावेळी उपस्थित मान्यवरांनी अभिवादन सोहळ्यातून व्यक्त केले. असा हा अथांगज्ञानाचा सागर असून त्यातून कितीही ज्ञान घेतले तरी हा सागर आटणार नाही, असे मौलिक विचार प्रमुख पाहुण्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हारार्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त उपस्थितांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत चंदनखेडे यांनी तर आभार प्रदर्शन आकाश बोरकर यांनी केले. 

कर्यक्रमाला किसनराव भगत, रमेश पाटील, कैलास बोरकर, अरुण चंदनखेडे, अनिल भगत, राहुल चंदनखेडे, वैभव गजभिये, रंजना चंदनखेडे, कांताबाई गजभिये, मीराबाई धवन, शशिकला बोरकर, लताबाई आवळे, सुरेखा गजभिये, प्रिया भगत, इंदू पळवेकर, ज्योती नगराळे, नीता नगराळे, ज्योती गरपाळ यांच्यासह रेल्वे कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.