Page

सिमेंट रस्त्याचे योग्यरीत्या बांधकाम न केल्याने रस्त्यावर साचते पाणी


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.१९) : लाखो रुपयांचा निधी खर्च करून शहरात अंतर्गत सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. पण शहरातील काही सिमेंट रस्त्यांची कामे पाहता कंत्राटदाराच्या बांधकाम क्षेत्रातील अनुभवावरच संशय येतो. काही ठिकाणी अगदीच ओबडधोबड रस्ते बांधण्यात आले आहे. तर काही ठिकाणी रस्त्यांचा उतार योग्यरीत्या काढण्यात न आल्याने रस्त्यांवरच पाणी साचून राहतांना दिसते. कंत्राटदारांनी रस्ते तयार केल्या नंतर त्यांचा दर्जा तपासण्याची संबंधित विभाग तसदी घेत नसल्याने नव्याने तयार करण्यात आलेले रस्तेही त्रासदायक ठरताना दिसत आहे. कंत्राटदारांनी तयार केलेल्या रस्त्यांचे मूल्यमापन होत नसल्याने रस्ते तयार करतांना कंत्राटदार योग्यता जपताना दिसत नाही. न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानापासून तयार करण्यात आलेल्या सिमेंट रोडचे बांधकाम योग्य पद्धतीने करण्यात न आल्याने या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहतांना दिसते. अगदी दुकानांसमोरच पाणी साचून राहत असल्याने दुकानदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर तलावाप्रमाणे पाणी साचून राहत असल्याने कंत्राटदाराच्या अनुभवाची शहरात चांगलीच चर्चा होत आहे. तसेच कंत्राटदाराच्या कामाचे पुनरावलोकन न करणाऱ्या संबंधित विभागाच्या कर्तव्यदक्षतेवरही प्रश्न उपस्थित होतांना दिसत आहे. 
न्यायाधीशांच्या शासकीय निवास्थानापासून काही महिन्यांपूर्वी विस्तृत सिमेंट रोड तयार करण्यात आला. कंत्राटदाराने या सिमेंट रोडचे रचनात्मक पद्धतीने बांधकाम केल्याचे दिसून येत नाही. रोडचा उतार काढतांना कंत्राटदाराचे मेजरमेंट चुकल्याचे दिसून येते. या सिमेंट रोडची बांधणी करतांना कंत्राटदाराचा अनुभवही कमी पडल्याचे पाहायला मिळते. या सिमेंट रोडवर अगदी दुकानांच्या समोर पावसाचे पाणी साचून राहतांना दिसते. एका बाजूचा काही रस्ता पाण्यानेच व्यापून रहात असल्याचे दिसून येते. साचलेल्या या पाण्याचा रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना तर त्रास होतच आहे, पण दुकानदार व ग्राहकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीजबिल भरणा केंद्रही याच रस्त्यावर असून वीजबिल भरणा केंद्राच्या समोरच पाणी साचून रहात असल्याने वीजबिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांमधूनही कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसतो आहे. साचलेल्या पाण्यात जनावरे लोळत असल्याने घाण तयार होऊन संसर्गजन्य आजार पसरविणाऱ्या जंतूंची उत्पत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा सिमेंट रोड नागरिकांचा संताप वाढविणारा ठरला आहे. या रस्त्याचे बांधकाम योग्यरीत्या करण्यात आले नसून संबंधित विभागानेही याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या दुकानांसमोर पाणी साचून रहात असल्याने दुकानदारांचा मनःस्ताप वाढू लागला आहे.