Page

अवजड वाहनांनी करण्यात येणारी रेतीची वाहतूक थांबवावी, ट्रॅक्टर मालक कल्याणकारी असोशिएशनची मागणी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.१८) : रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रक टिप्पर या सारख्या अवजड वाहनांना शहर व शहरालगतच्या परिसरातून रेतीची वाहतूक करण्यापासून रोखण्याची मागणी ट्रॅक्टर मालक कल्याणकारी असोशिएशन वणीच्या वतीने करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून असोशिएशनचे अध्यक्ष धर्मा काकडे व सचिव धिरज पाते यांनी ही मागणी केली आहे. 
नियमांचे उल्लंघन करून शहर व लगतच्या परिसरातून अवजड वाहनांनी रेतीची वाहतूक केली जात आहे. शहर व लगतच्या परिसरात रेती वहन करण्याकरिता अवजड वाहनांचा वापर केल्या जात आहे. रेती घाटांवरूनही अवजड वाहनांनीच बांधकाच्या ठिकाणी रेती पोहचविली जात आहे. नियमांना धाब्यावर बसवून धडल्याने शहर व शहरालगतच्या परिसरात अवजड वाहनांनी रेतीची वाहतूक सुरु आहे. त्यामुळे मालवाहू ट्रॅक्टरना रेती वहनाचे भाडे मिळणे कठीण झाले आहे. शहरातील बहुतांश गरीब वर्गाने रोजगाराकरिता ट्रॅक्टर खरेदी केले आहे. शेतकरी कुटुंबांनीही कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा याकरिता लोनवर ट्रॅक्टर घेतले. शेतीचा हंगाम झाल्यानंतर ट्रॅक्टर ट्रालीने मालवाहतूक करून उदर्निवाहाचे गणित जुडविता यावे म्हणून कित्येक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतले. पण त्यांना मागील काही दिवसांपासून रेती वहनाचे भाडे मिळणे कमी झाले आहे. त्यामुळे ट्रॅक्टर मालवाहतुकीतून मिळणाऱ्या मिळकतीवर उपजीविका चालविणारे बेरोजगारीच्या खाईत लोटले जात आहे. ट्रॅक्टर वाहतूकदार व ट्रॅक्टरवरील मजुरांनाही कामे मिळणे दुरापास्त झाले असून ट्रॅक्टरचे मासिक हप्ते भरणेही कठीण होऊ लागले आहे. अशीच अवजड वाहनांनी रेतीची वाहतूक सुरू राहिल्यास ट्रॅक्टर वाहतूकदारांच्या उपजीविकेचे प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शहरात व शहरालगतच्या परिसरात अवजड वाहनांनी होणारी रेतीची वाहतूक रोखण्याची मागणी ट्रॅक्टर मालक कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.