सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबी उत्सव शुक्रवारी (ता. 5) मोठया उत्सहात साजरा करण्यात आला.शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने लक्ष वेधून घेतले.
मोमीनपुरा वार्डातील ख्वाजा गरीब नवाज दर्गाह येथून सकाळी 11 वाजता या मिरवणुकीला प्रारंभ झाला. येथील मोमीनपुरा, खाती चौक, टिळक चौक, आंबेडकर चौक, जटा शंकर चौक, गांधी चौक, भगत सिंग चौक, रंगनाथ चौक, भारत माता चौक मार्गे मोमीनपुरा येथे या मिरवणुकीची सांगता झाली.
ठिकठिकाणाहून आलेल्या या मिरवणुकीत तरुणांसह चिमुकले व आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकांनी एकमेकांना अलिंगण देऊन मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या.
ही मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी तरुण, प्रतिष्टीत नागरिक आणि विविध सामाजिक संस्थानी आदींनी पुढाकार घेतला. यादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व मुस्लिम बांधवानी देशाची शांतता व एकता, प्रगतीसाठी प्रार्थना केली. यनिमित्ताने शहरातील सर्व मशीदीवर व मुस्लिम बहुल परिसरात विद्युत रोषणाई पहायला मिळाली. नागरिकांना ठिकठिकाणी शरबत, अल्पोहाराची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती.तर काही ठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात आले.