सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील असलेल्या थोर महापुरुषांच्या पुतळ्यांची होत असलेली दुर्लक्षित आणि दयनीय स्थितीबाबत उबाठाचे शिवसैनिक साकेत भुजबळराव यांनी उपविभागीय अधिकारी यांना चर्चा करून निवेदन देत आपली तीव्र नाराजी जाहीर केली.
नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या वणी शहरांमध्ये थोर महापुरुषांचे पुतळ्याचे सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि अतिक्रमण हटावण्याची नितांत गरज झाली आहे. सन २०१३ च्या नंतर या पुतळ्यांची देखभाल न केल्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. असं त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर सर्व प्रेरणा देणाऱ्या पुतळ्यांच्या परिसरातील अतिक्रमण, अनधिकृत बॅनर त्वरित काढावेत, चबुतरे, संरक्षक कठडे व ग्रॅनाइट टाईल्स यांची दुरुस्ती करावी, नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, पुतळ्यांच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावीत, इत्यादी मागण्या येत्या सात दिवसांत पूर्ण न झाल्यास, शिवसेना-युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा गर्भित इशारा देखील साकेत भुजबलराव यांनी निवेदनातून दिला आहे.
निवेदन देताना अजय चन्ने, विलास भट, सुजल तिवारी, सुनील खडतकर, सागर सोनेकर, अनिकेत टिकले, अंकुश रावत, अरिहंत, आकाश खंडाळकर व शिवसेनेचे व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.