सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : सोमवार रात्रीची वेळ, जेवण आटोपून 30 वर्षीय तरुण घराबाहेर पडला,मात्र घरी न परतताच सकाळी गावाच्या काही अंतरावर असलेल्या नाल्यातच त्याची दुचाकी सह तो मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
उमेश मारोती सातपुते रा. सेलू असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. वणी तालुक्यातील सेलू येथील हा विवाहित तरुण सोमवारी रात्री 10 वाजता चे दरम्यान,गणपतीचे जेवण करून मोटारसायकलने काहीकामानिमित्त घराबाहेर पडला,सेलू नांदेपेरा मार्गावरील नाल्याच्या पुलावरून जात असतांना किंबहुना परततांना त्याचे मोटारसायकल वरील नियंत्रण सुटले व तो मोटारसायकल सह नाल्यात आदळला, असा कयास वर्तविण्यात येत आहे. उमेश हा दुचाकीसह नाल्यात पडल्याने त्याला जबर मार लागला. तसेच रात्रभर तो नाल्यातच पडून राहिल्याने त्याचा मृत्यू झाला. सकाळी गावातीलच काही लोकांना दुचाकी व तरुण नाल्यात पडून असल्याचे आढळले. नंतर ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. अशातच नाल्यात पडून असलेला विवाहित तरुण हा उमेश सातपुते असल्याचे बघणाऱ्यांच्या लक्षात आले. नंतर ही माहिती त्याच्या कुटुंबियांना व पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
नांदेपेरा मार्गे शेलू गावाजवळील नाल्यावर असलेला हा पूल अरुंद असून त्याला सुद्धा कठडे नाही, त्यामुळे तरुणाचे संतुलन बिघडल्याने तो मोटारसायकल सह नाल्यात पडल्याची चर्चा गावातून ऐकायला मिळत आहे. उमेश च्या पश्च्यात आई वडील,पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.