Page

पोलिसांनी आरोपीना नागपूर भंडाऱ्यातून आणले वणीत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरात मागील काही महिन्यापासून सराईत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोऱ्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यामुळे वणी पोलीसांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. ह्यातील काही चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अतिशय शिताफीने शोधून काढले व वणीत आणले. 

वणी शहरालगत सहारा पार्क मध्ये 8 फेब्रुवारी 2024 रोजी चोरी झाली होती, या घटनेतील दोन आरोपींना वणी पोलिसांनी अटक केली आहे. आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडिया (29) आणि पंकज श्रावण खोकरे (31) असे आरोपीचे नाव आहे.दोन्ही रा. हुडकेश्वर जि. नागपूर येथील असून आरोपी हे हात साफ करण्यात अव्वल आहे. पोलिसांनी आरोपी आकाश याला नागपूर कारागृहातून तर पंकजला भंडारा जिल्हा कारागृहातून प्रोड्युस वॉरंटवर ताबा घेऊन पोलिसांनी शुक्रवारला वणीत आणले. 

वणी शहरासह परिसरात दरोडा, हाणामाऱ्या, खूनखराबा व सर्वात म्हणजे चोऱ्याचे प्रमाण वाढल्यानं पोलीस प्रशासनावर समाज माध्यमातून चांगलाच दबाव व प्रश्न चिन्ह निर्माण होत होते. अशातच सहारा पार्क येथील शंकर किसन घुगुल व त्यांची पत्नी घर बंद करून कामावर गेले असता अज्ञात चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून अलमारीतील 4 तोळ्याची सोन्याची पोत, कानातले रिंग व 5 हजाराची रोख रक्कम असे एकूण 1 लाख 73 हजाराचा ऐवज लंपास केला होता. त्यामुळे घटनेचा तपास करताना पोलिसांनी सिसि टिव्ही फुटेज व नागपूर पोलिसांच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून नागपूर व भंडारा कारागृहातून या दोघांना ताब्यात घेतले आहे. 

ताब्यात घेतलेल्या आरोपीने सहारा पार्क (वणी) येथून चोरी केलेले सोन्याचे दागिने नागपूर येथील सोनाराकडे ठेवल्याची कबुली दिली. कबुलीवरुन पोलिसांनी आरोपींना सोबत घेऊन नागपूर येथील मानेवाडा परिसरात स्थित सराफा दुकानात जाऊन 34.820 ग्राम सोन्याची किंमत 2 लाख 38 हजार रु. जप्त केले.