सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : राळेगाव व मारेगाव तसेच सावंगी ते खैरी या मार्गावरील बससेवा पूर्ववत करण्यासाठी मारेगाव मनसे महिला सेना तालुकाध्यक्षा उज्वला चंदनखेडे यांच्या नेतृत्वात मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन बससेवा सुरळीत करण्याची मागणी केली.
वणी मतदारसंघातील मारेगाव तालुक्यातील प्रवाशांना राळेगाव व मोरगाव या शहराकडे जाण्यासाठी पूर्वी मानव विकास ची एसटी बस सुरू होती. मात्र मध्यंतरी काही कारणास्तव ही बस फेरी बंद करण्यात आली त्यामुळे प्रवाशांना प्रवासास अत्यंत अडचण निर्माण झाली. त्याचबरोबर सावंगी ते खैरी ही शाळकरी मुलांसाठी असलेली बस फेरी देखील बंद करण्यात आली असून सध्या आता १० आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांचे तास चालू आहेत त्यांना देखील प्रवासासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत हा बस फेरी चा सुरू असलेल्या सावळ्या गोंधळामुळे नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची तारांबळ झाली आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील बस सेवा पूर्ववत करण्यासाठी मारेगाव मनसे महिला सेना तालुकाध्यक्षा उज्वला चंदनखेडे यांच्या नेतृत्वात मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन लवकर बससेवा सुरळीत करण्याची मागणी केली. या मागणीला आगार प्रमुखांनी प्रतिसाद देत लवकरच या बससेवा पुन्हा सुरळीत करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळणार असल्याचे आश्वासित केले.