Page

सिंधी कॉलनी मारहाण प्रकरण : त्या दोघांची न्यायालयाने केली कारागृहात रवानगी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : जुना बस स्टॅन्ड सिंधी कॉलनीतील एका रेस्टॉरंट मध्ये शुल्लक कारणावरून एका 60 वर्षीय व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारीच्या रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांवर पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

मात्र, या घटनेच्या निषेधार्थ सिंधी कॉलनीतील असंख्य तरूणांनी पोलिस स्टेशन गाठून ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सविस्तर असे की, शनिवारच्या रात्री 10 वाजता च्या दरम्यान तक्रारदार सुदामा हरिदासमल साधवाणी (60) रा.सिंधी कॉलनी हे जेवण करून त्याचा मित्र दिपक वाधवाणी यांच्या क्वालिटी रेस्टॉरंट येथे जाऊन नेहमीप्रमाणे दररोज गप्पा मारत बसले होते. दरम्यान, दिपक सोबत गप्पा मारत असताना तिथे सुधिर पेटकर व करण चुनारकर हे भोजन करीत होते. त्या दोघांनी सुदामा याला जेवन करण्यास बोलाविले मात्र, सुदामा यांनी जेवण झाल्याचे सांगुन नकार दिला. तेव्हा सुधिर पेटकर यांनी तुला जेवण करायचे नसेल तर आमच्या जेवणाचे बिल दे असे म्हणून दोघांनीही टेबल वरील काचेचे ग्लास सुदामा यांना फेकून मारले. त्यावेळी सुदामा यांच्या हाताला दुखापत झाली.

हे प्रकरण इथेच थांबले नाही, त्यानंतर त्या दोघांनी लोखंडी तवा, कुकर यांनी मारहाण केली. त्याच वेळी करणने सुदामा यांच्या हातातील सोन्याची अंगठी हिसकावून घेतल्याने सुदामा हा घाबरला आणि घराकडे पळता वाट काढली असता त्या दोघांनी त्याचा पाठलाग करून त्याला घरातून ओढून पुन्हा मारहाण केली. दरम्यान सुदामाचे नातेवाईक यांनी वाद सोडविण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांना सुध्दा मारहाण करण्यात आली. त्यानंतर तक्रारदार व आरोपी दोघेही पोलिसात पोहचले.

या प्रकरणी फिर्यादी सुदामा साधवाणी यांचे तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी सुधीर पेटकर (40) रा. नांदेपेरा रोड, व करण चुनारकर (38) रा. दामले फैल यांच्यावर भादंवि च्या कलम 394, 452, 294, 504, 506, 34 तथा शासकीय कामात अडथळे निर्माण केल्या प्रकरणी भादंवि च्या कलम 353, 504, 506, 34 नुसार गुन्हे दाखल केले आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.