सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
राजूर (कॉ.) येथे अवैध धंदे फोफावले असल्याची गावकऱ्यांमधून ओरड सुरु होती. राजूर येथील अवैध धंद्यांबाबत माध्यमांनीही वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे ठाणेदार अजित जाधव यांनी राजूर (कॉ.) येथील अवैध धंद्यांकडे लक्ष केंद्रित केले. त्यांना येथील तेलगू वार्ड परिसरात राजरोसपणे मटका अड्डा चालविला जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ राजूर येथे पोलिस पथक पाठविले. पोलिसांना तेथे मटका जुगार खेळणाऱ्यांची मोठी गर्दी आढळून आली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्या मटका अड्यावर धाड टाकली. मटका पट्टी फाडणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली. तर काही जणांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी मटक्याची उतारी घेणाऱ्या शरद पुनवटकर रा. वणी या आरोपीला मटका मालकाचे नाव विचारले असता त्याने विजय कंडेवार याच्या मालकीचा हा मटका अड्डा असल्याचे सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी शरद पुनवटकर याच्या जवळून रोख २ हजार १७० रुपये व मटका साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी शरद पुनवटकर व विजय कंडेवार या दोघांवरही पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. मटका चालक विजय कंडेवार हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे. सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, डीबी पथकाचे विकास धडसे, सागर सिडाम, सुनिल नलगंडीवार यांनी केली.