टॉप बातम्या

वांजरी खानपट्टा धारकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - शहर-ए-मदिना सोशल फाउंडेशनची मागणी


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शहराच्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वांजरी येथील खुल्या खानीमुळे तयार झालेल्या खोल खानीत शनिवारी (ता.2) सप्टेंबर रोजी वणी शहरातील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, खान धारकाने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न केल्याने तीन निष्पाप जीवांचा बळी गेला, असा आरोप करत खानपट्टा धारकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच शासनातर्फे मृतकाच्या परिवारांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शहर-ए-मदिना सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबतचे निवेदन वणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.

शनिवारी 2 सप्टेंबर ला आसिम अब्दुल सत्तार शेख (16), नुमान शेख साबिर शेख ( 16 ) दोघेही रा. एकता नगर व प्रतीक संजय मडावी (16) रा. प्रगती नगर हे तिघेही मित्र वांजरी येथे असलेल्या खदानीच्या पाण्यात पोहायला गेले होते, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या ठिकाणी त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण समाजमन हेलावून गेले होते. मात्र, मृतकाच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी किंवा खानधारक कुणीही आले नाही. सदर खाण ही शासनाने उत्खणणासाठी भाडे तत्वावर दिली गेली आहे. पावसाळ्यात खानीत पाणी साचत असल्याने उत्खणनाचे काम बंद असते. सदर खान ही पाणी भरल्याने बंद अवस्थेत आहे. मात्र, या ठिकाणी खान धारकाने सुरक्षेच्या दृष्टीने तारांचे कुंपण केले नाही. शिवाय या ठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात नाही. त्यामुळे 3 निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
शासनाच्या वतीने या मृतक बालकांच्या परिवारांना आर्थिक मदत देण्यात यावी तसेच वांजरी येथील खानपट्टा धारकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात यावे व वणी व मारेगाव तालुक्यातील सर्व खदानीची मोजमाप करण्यात यावे, जे खदान नियमानुसार चालवीत नसेल त्या खदानीचा खानपट्टा रद्द करण्यात यावा व बंद झालेली खदानी नियमाप्रमाणे विल्हेवाट लावण्यात यावी अशी आग्रही विनंती करण्यात आली आहे.

या वेळी मिर्झा जफर बेग, रज्जाक पठाण, सिद्धीक रंगरेज, जाफर अली, मोहंमद आफताब अब्दुल सत्तार, अब्दुल आसीम अब्दुल आलीम, मोबिन शेख, सोहेल अहेमद आझाद अहेमद, अब्दुल सत्तार साहिल हुसैन शेख, इरशाद शेख शेख, संजय मडावी यांच्यासह असंख्य नागरिकांची उपस्थिती होत.
Previous Post Next Post