सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : तालुक्यातील रेती घाटाचा लिलावच नसल्याने वाळू तस्कर कुणालाही न जुमानता, राजरोसपणे वाळूची तस्करी करित होते, प्रशासन मात्र मूग गिळून गप्प का? तलाठी काय करत आहे? संबंधितांच्या संगणमताने तर हि तस्करी चालू तर नाही ना? सदर तालुका प्रशासनाची वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी चौकशी करणार का? असा सवाल सामान्य नागरिकांसह लाभार्थी करत असतांना शुक्रवारी 16 जून च्या पहाटे महसूल व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईने अवैध रेतीची वाहतूक करणारे विनानंबरचे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. या धडक कारवाईने अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
तालुक्यात दिवसरात्र बिनदिक्कत सुरु असलेल्या घाटाची मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नव्यानेच पदभार स्वीकारलेले तहसीलदार निलावाड यांनी आज पहाटे 16 जुनला सकाळी 7.30 वाजताचे दरम्यान,तालुक्यातील दांडगाव येथे वाळू ची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर मारेगाव महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने पकडले. विशेष उल्लेखनीय की, पहाटे 4:30 वाजेपासून पथक दांडगाव येथे दबा धरून बसले होते.
विशाल अभिमान लांबट व विनोद पंढरी ढेंगळे दोन्ही रा.दांडगाव अशी जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर मालकांची नावे असून दोन्ही ट्रॅक्टर मारेगाव येथील तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले आहे. सदरची कारवाई मारेगाव येथील तहसीलदार यु.एस.निलावाड, मंडळ अधिकारी अमोल घुगाने, चालक विजय कनाके, पोलीस विभागाचे एएसआय प्रमोद जिड्डेवार, नापोका अजय वाभिटकर यांनी केली.
नागरिकांना स्वस्त दरानं वाळू (रेती) मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा, या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं नवीन वाळू धोरण जाहीर केलं आहे.मात्र हे धोरण फोल ठरत असल्याचे मत तालुक्यातील नागरिकांसह लाभार्थ्यांकडून या कारवाई निमित्ताने व्यक्त होत आहे.