'भाजप हटाव - देश बचाव' भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ तालुक्यात रूई येथुन अभियानाला सुरुवात...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : देशात गेली ९ वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी व विषमतेच्या खाईत लोटली जात आहे. देशाची अर्थव्यवस्था पार रसातळाला गेली असून, एकूण लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली जात आहे. अशा परिस्थितीत हुकूमशाही पद्धतीचे निर्णय घेणाऱ्या आणि जनविरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजपला सत्तेतून हद्दपार करणे हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने १४ एप्रिल ते १५ मे पर्यंत 'भाजप हटाव - देश बचाव' ही जनजागरण मोहीम देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार घेतला असुन त्याचाच भाग म्हणून यवतमाळ जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध तालुक्यात मोहीम सुरु आहे.आज यवतमाळ तालुक्यातील रूई वाई येथुनही मोहीमेला सुरवात करण्यात आली आहे.याप्रसंगी मोहीमे ला सुरुवात करतांना पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अनिल घाटे म्हणाले, की भाजप सरकारने गेल्या ९ वर्षांच्या काळात संसदीय लोकशाही पद्धतीला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा आणि भ्रष्टाचार यांचा जवळचा संबंध हिंदेनबर्ग रिपोर्टच्या निमित्ताने अधिक उघड झाला आहे. सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही लेबल लावून विरोधी स्वर दाबण्याचा प्रकार होत आहे. भाजप सरकारने सामाजिक न्यायाच्या तत्वाला पूर्णपणे हरताळ फसला असून, एकीकडे दलितांवरील अत्याचार वाढत असताना, विविध घटनांमध्ये दोषी असणाऱ्या आरोपींना सरकार मोकाट सोडत आहे. अल्पसंख्यांकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून, समाजात दुही निर्माण केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून व राज्यपाल पदाचा दुरुपयोग करून विविध राज्यातील सरकार पाडण्याचे कारस्थान भाजपाकडून सातत्याने केले जात आहे. महाराष्ट्रातही हाच प्रकार गेल्यावर्षी दिसून आला असून, त्यामुळे लोकशाहीच धोक्यात येऊ लागली आहे. याशिवाय बेरोजगारीचे प्रश्न वाढत असून, शेतीवर देखील मोठ्या प्रमाणात हल्ले होते आहेत. कामगार, कर्मचाऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असून, या कडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अशा भाजप सरकारला धडा शिकविण्यासाठी त्यांना सत्तेवरून हटविण्यासाठी लोकांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन कॉ.अनिल घाटे यांनी केले.यावेळी राज्यभरातून आलेल्या पक्षाच्या राज्य कौन्सिल सदस्यांनी आणि जिल्हा सेक्रेटरींनी महाराष्ट्रात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला प्रमाणे यावेळी मोहिमेच्या पोस्टर व प्रचार पत्रकाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.अनिल घाटे , कॉ.बंडु उईके , नारायणराव बोरकर, निरंजन गोंधळेकर, ईश्वर दरवरे , गुलाबराव उमरतकर , दिलीप‌ महाजन, दिवाकर नागपुरे, अभिक्षक उईके, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
'भाजप हटाव - देश बचाव' भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ तालुक्यात रूई येथुन अभियानाला सुरुवात... 'भाजप हटाव - देश बचाव' भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ तालुक्यात रूई येथुन अभियानाला सुरुवात... Reviewed by सह्याद्री चौफेर on April 24, 2023 Rating: 5
Powered by Blogger.