Page

वणी तालुक्यातून कोरोना काढतोय पळ, आज एकही रुग्ण आढळला नाही

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.३) : तालुक्यात कोरोनाच्या संक्रमणाला ब्रेक लागला असून नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण अगदीच कमी झालं आहे. मागील काही दिवसांत कोरोनाचे अत्यल्प रुग्ण आढळले असून तालुक्यातून कोरोना पळवाट काढत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना संक्रमणाची गती मंदावली असून रुग्ण आढळण्याचे प्रमाण अगदीच कमी झाले आहे. आज तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढलेला नाही. तर १९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाल्याने प्रशासनानेही सुटकेचा निश्वास टाकला आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आता केवळ ५३ राहिले आहेत. 
आज तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले नसून आज करण्यात आलेल्या १५२ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आला नाही. आता फक्त ९७ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. ५३ सक्रिय रुग्णांपैकी १० रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून २९ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहे. तर १४ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहे. नवीन रुग्ण आढळणं अगदीच कमी झालं असून झटपट रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतत आहेत. तालुक्यात आता पर्यंत २४२०६ व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून २१७६५ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहे. आरोग्य विभागाने जास्तीतजास्त चाचण्या करण्यावर भर दिल्याने रुग्णांचं झटपट निदान लागून त्यांना वेळेत उपचार मिळाले. त्यामुळे रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. आरोग्य यंत्रणेच्या योग्य उपचार प्रणालीमुळे कित्येकांच्या आरोग्यात सुधार होऊन ते ठणठणीत बरे झाले.