टॉप बातम्या

अर्धनग्न घंटानाद आंदोलन मागे; प्रशासनाच्या आश्वासनानंतर निर्णय


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव शहरातील बेलगाम वाहतुकीच्या प्रश्नावरून सुरू करण्यात आलेले अर्धनग्न घंटानाद आंदोलन अखेर मंगळवार, दि. 17 मार्च रोजी मागे घेण्यात आले. शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकार यांच्या नेतृत्वात दुपारी सुमारे एक वाजता आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी दि. 16 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालय मारेगाव येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत दररोज मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती.


मारेगाव शहरातील वाढत्या व बेशिस्त वाहतुकीविरोधात उपोषणकर्ते विलास गोविंदराव रायपुरे व गजानन सुधाकर चंदनखेडे यांनी वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी यांच्या मार्फत कुमार चिंता जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. मारेगावातील गर्दीच्या ठिकाणी खाजगी बसेस व प्रवासी ऑटो रस्त्यावरच थांबत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब त्यांनी मांडली होती. वाहनांच्या संख्येपेक्षा बेशिस्तपणा हेच वाहतूक कोंडीचे मुख्य कारण असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बाजाराच्या दिवशी व इतर महत्वाच्या बंदोबस्तासाठी अंमलदार नेमण्याबरोबरच, पोलीस स्टेशन मारेगाव येथील एक अंमलदार व वाहतूक शाखा वणी येथील दोन अंमलदार यांची डॉ. बाबासाहेब चौक, मार्डी चौक, राष्ट्रीय विद्यालय चौक व घोन्सा रोड येथे नियमित नेमणूक करण्याची तजविज करण्यात आली आहे. तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या या भूमिकेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून, विजय महाले (सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी) व मारेगाव ठाणेदार शाम वानखेडे यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका समन्वयक संजय आवारी, सोमेश्वर गेडेकर, जीवन काळे, चांद बहादे, राजू मांदाडे, सुधाकर भगत, धनराज भट, पंकज खिरटकर, गोविंदा निखाडे, आदींची उपस्थिती होती.

यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन शिस्त लागेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();