Page

...तर वे.को.ली. वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करु - मनसे


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणीतालुक्यातील बेलोरो चेक पोस्ट येथे कोळसा वाहतुकीच्या धुळीमुळे काल (दिनांक १९ मे ) रोजी दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाल्याने एक व्यक्तीचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याने आज मनसेने वेकोलीला चांगलेच धारेवर धरले. मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी वेकोलीच्या क्षेत्रिय महाप्रबांधकाना निवेदन देऊन उडणाऱ्या धुळीवर व वाहतुकीवर नियंत्रण आणावे अशी याबाबत चर्चा केली आहे. 
 
वेकोलीच्या अखत्यारीतील येणाऱ्या भागात वाहतुकीतुन उडणारी धूळ व अरुंद रस्त्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून बेलोरा फाटा आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वणी क्षेत्राअंतर्गत अनेक खदानी आहेत. या खदानीतून दिवसाकाठी हजारो टन कोळसा उत्पादित केला जातो. परंतु सदर कोळसा उत्पादित करत असतांना याचा फटका व दुष्परिणाम आजूबाजुच्या गावाला आणि सर्वसामान्यांच्या जीवावर होत आहे. ही वाहतूक होत असताना रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला मोठया प्रमाणात धूळ साचलेली आहे. या धुळीवर पाणी किंवा अन्य उपाययोजना करुन हे नियंत्रणात आणणे वेकोलिचे कर्तव्य आहे. परंतू याची कुठलेही जाणीव या विभागाला अधिकारी ठेवत नाही. परिणामी अनेक लहान सहान अपघात होत आहे. तर काल नुकताच बेलोरा चेक पोस्ट जवळ भीषण अपघाताची घटना घडली. 

बेलोरा चेक पोस्ट आणि परिसर हे अपघाताचे क्षेत्र बनत असून याठिकाणी उडणाऱ्या व जमा होणाऱ्या धुळी वर नियमीत पाणी मारणे व अन्य उपयोजना करणे गरजेचे आहे. अरुंद रस्ता असल्याकारणाने गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांना आणि त्या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे, यास जबाबदार कोण ? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रश्नावर येत्या आठ दिवसात कार्यवाही न केल्यास व यापुढे याठिकाणी कोणत्याही अपघातातून जीवितहानी झाल्यास वेकोली अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करु, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. या आशयाचे निवेदन तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी वेकोली व शिरपूर पोलिस स्टेशनला देण्यात आले.

यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष धिरज पिदुरकर, आकाश नान्हे, गणेश भोंगडे, नत्थु झाडे, राजू तुराणकर, रत्नाकर मिलमिले, गणेश तुराणकर, गौरव बोबडे, अक्षय कुमरे, प्रमोद तुराळे, भिवसेन डंभारे, मंगेश तुराणकर, सुधाकर झाडे, मंगेश बाबडे, संदीप इंगोले यांच्यासह अनेक मनसैनिक उपस्थित होते.