Page

मुलाच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : संशयास्पद अवस्थेत प्रज्योत भीमराव मून या तरुणाचा मृतदेह नवरगाव (धरण) परिसरात 27 मार्च रोजी सापडला. या प्रकरणी मृतकाच्या पित्याने मारेगाव पोलिसात तक्रारही दिली. मात्र, महिना उलटूनही या प्रकरणाची चौकशी न झाल्याने मृतकाच्या पित्याने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. आपल्या मुलाचा खून झाला असून आरोपीवर खुनाचे गुन्हे नोंदवा, अशी मागणी त्यांनी 8 मे रोजी केली आहे.

भीमराव मारोती मून रा. रासा, (ता. वणी) असे मृतकाच्या पित्याचे नाव आहे. 27 मार्चला त्यांच्या प्रज्योत नामक मुलाचा मृतदेह आढळला. 29 मार्चला भीमराव मून यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. 10-12 वेळा मारेगावचे पोलीस अधिकारी सावंत यांचेकडे आम्ही गेलो. मात्र, त्यांनी चौकशी सुरू आहे असे सांगून वेळकाढूपणा केल्याचा मून यांचा आरोप आहे. आपल्या मुलासोबत कोण राहत होते, याची माहिती देण्यात आली. मात्र, या प्रकरणात आपल्या मुलाची हत्या झाली असून आरोपीचा शोध घेऊन खुनाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी मून यांची आहे. वणीच्या एसडीपीओंनाही तीन-चार वेळा भेटून त्यांनीही टोलवाटोलवी केली. त्यामुळे सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न पोलीस करीत असल्याचा आरोप मून यांनी केला आहे.