Page

उमेदवार घेऊन आलो, पण आमदार घेऊन जाणार - उद्धव ठाकरे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आता वणी चा उमेदवार आपल्याला मशालीचाच पाहिजे,एवढंच नाही तर आसपास च्या परिसरामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे, मग तुतारी फुंकणारा मावळा असेल, हात आहे आणि मशाल असेल त्यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला पाहिजे, महाविकास आघाडी चे उमेदवार घेऊन आलो पण आमदार घेऊन जाणार, अशी गर्जना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वणी येथील जाहीर सभेत केली. 

यावेळी उमेदवार संजय देरकर, माजी आ. वामनराव कासावार, खा. प्रतिभा धानोरकर, शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी, जिल्हा संपर्क प्रमुख, राजेंद्र गायकवाड, अ‍ॅड. देविदास काळे, प्रा.टिकाराम कोंगरे आदींची उपस्थिती होती. 

सभेला सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा खरपूस समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. महिला सुरक्षित नाहीत. आमचं सरकार आलं की, लाडकी बहिणीला महिन्याचे 3 हजार रुपये देऊ, महिलांसाठी स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन उभारू, शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देऊ, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती किमान कमी करून पाच वर्ष स्थिर ठेवू, मुलीप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देऊ, गुजरात ला नेलेले सर्व उद्योग परत महाराष्ट्रात आणू अशी बोलताना ग्वाही दिली. डोळ्यावरची पट्टी काढून डोळसपणे येत्या 20 तारखेला सर्वांनी मशाल ला मतदान करा, संजय देरकर यांना निवडून द्या असे त्यांनी आवाहन केले. 

जाता जाता आता ही जबाबदारी खा. धानोरकर यांच्या वर सोपविली आहे. आम्ही लोकसभेमध्ये लक्ष दिलं,तुम्ही विधानसभेत लक्ष द्या, असेही ते यावेळी म्हणाले. शेवटी सभेची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी वणी विधानसभा मतदार संघातील नागरिक मोठ्या संख्येने ठाकरेंच्या जाहीर सभेला उपस्थित होती.