सह्याद्री चौफेर | राजू डावे
गेल्या एक वर्षापासून वणी, शिरपूर व मुकुटबन पोलिस ठाण्याच्या हद्दीत महावितरणच्या विद्युत तारा व लोखंडी खांब कापण्याचा सपाटा सुरू असून यात लाखों रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला जात आहे. याबाबत विद्युत विभाग मार्फत वणी, शिरपूर आणि मुकुटबन पोलिसात तक्रार दाखल असुन अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने चोरटे मोकाट फिरत आहे. असा आरोप अजिंक्य शेंडे यांनी केला आहे. गंभीर बाब म्हणजे याप्रकरणात आतापर्यंत तिन युवकांचा विद्युत करंट लागुन मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे.
दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ रोजी मुकुटबन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परसोडा परिसरात विद्युत तारा कापण्याचा प्रयत्न करत असताना एका युवकाचा मृत्यू झाला आहे. अश्याच प्रकारच्या घटनेत काही महिन्यांपूर्वी दोन युवकांचा बळी गेला आहे. तरीसुद्धा विद्युत तारा व लोखंडी खांब कापण्याचा सपाटा सुरूच आहे. मात्र, चोरीतील मुद्देमाल हा भंगार व्यावसायिकांच्या घशात घातला जात आहे. यामध्ये भंगार व्यावसायिक मालामाल होत असून चोरटे दारुच्या नशेत आपला जीव गमावत आहे. ही चिंतेची बाब असून विद्युत तारा कापल्यावर वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे १८ नोव्हेंबर २०२३ ला विद्युत तारा कापण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा मृत्यू झाल्याने या चोरीच्या प्रकरणातील चोरटे निष्पन्न झाले असूनही ते आरोपी मोकाट फिरत असल्याचा,त्यांनी थेट सवाल शेंडे यांनी उपस्थित केला आहे.
ऐवढी मोठी गंभीर घटना घडत असताना मात्र वणी, शिरपूर व मुकुटबन पोलिस कारवाई न करता हातावर हात ठेवून निवांत बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपण या चोरीच्या घटनेचा तपास करावा व गुन्हेगारांवर आठ दिवसांच्या आत कारवाई करावी, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा गर्भीत ईशाराही अजिंक्य शेंडे यांनी दिला आहे.
वणी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शेतातील साहित्य, स्पींकलर, झटका मशीन असे साहित्य चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र, याबाबतची तक्रार देण्यासाठी शेतकरी वणी पोलीस ठाण्यात गेले असता तक्रारींची रिपोर्ट (FIR) घेण्यात येत नाही. त्यांना लेखी स्वरूपात तक्रार देण्याचा सल्ला देतात मात्र, तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. असा आरोप त्यांनी लगावला आहे.