Page

मच्छिन्द्रा ग्रामपंचायतला पडला विसर, रोगराई नियंत्रण फवारणी वर दुर्लक्ष

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मच्छिन्द्रा गट ग्रामपंचायतला विसर पडल्याचे निदर्शनास येत असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. गावातील किरकोळ समस्या सोडवण्यात पदाधिकारी अपयशी ठरत आहे. कोणाचा कोणालाही ताळमेळ दिसून येत नसून आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या पावसाळा सुरु आहे, सतत पाऊस पडत असतांना रोगराई डोकं वर काढत आहे. त्यामुळं गावात आरोग्याच्या दृष्टीने डास नियंत्रण औषधं फवारणी करणं आवश्यक झाले असून सुद्धा याकडे सरपंच दुर्लक्ष करित असल्याचे बोलल्या जात आहे. तालुका प्रशासन ऍक्शन मोड वर आहे. मात्र, स्थानिक मच्छिन्द्रा येथील पदाधिकारी कधी ऍक्शन मोड वर येतात, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या काही दिवसापासुन संपूर्ण तालुक्यात डोळे येण्याची विषाणुजन्य साथ सुरू आहे. शहरात अनेक वार्डात सध्या डोळ्याची साथ आलेल्या रुग्णांची संख्या वाढतांना पाहायला मिळत आहे. डोळ्याचा विषाणु ससंर्गजन्य हा सौम्य प्रकारचा ससंर्ग असला तरी देखील याबाबत आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.डोळे येण्याची परिस्थिती ग्रामीण भागातही दिसून येत असल्याने गावात रोगराई नियंत्रण औषधं फवारणी करणे आवश्यक आहे. परंतु ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आरोग्यच्या दृष्टीने तात्काळ डास व रोगराई नियंत्रण औषधं फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.