Page

अंगणवाडी रिक्त पदभरती प्रक्रियेला आला वेग

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये ३० हजारांहून अधिक मदतनीस व सेविकांची भरती सध्या सुरु आहे. सुरवातीला पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जात असून एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत सुरु असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची रिक्त पद भरतीचा तिढा सुटला असून आज १ मार्च पासून १५ मार्च पर्यंत इच्छुका कडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील अंगणवाडी रिक्त पदभरती प्रक्रियेला वेग आला आहे.

मारेगाव तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांची एकूण २२ पदे रिक्त आहे. यामध्ये मार्डी अंगणवाडी केंद्र क्रमांक २,गोरज, वेगाव, आकापूर, मांगरूळ,जळका, किन्हाळा, हिवरा, पार्डी,गाडेगाव, हटवांजरी, सगणापूर, नरसाळा अंगणवाडी केंद्र क्रमांक १ तथा केंद्र क्रमांक ३, टाकळी खैरगांव मच्छिद्रा, पंढरकवडा, शिवनाळा, कोथुर्ला,आणि पेंढारी इत्यादी केंद्राचा समावेश आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरात देत येत्या ३१ मे २०२३ पूर्वी भरण्या बाबतचा अध्यादेश धडकला असून ही भरती प्रक्रिया शासनाने निर्देशीत केलेल्या नियमानुसार पार पडणार आहे. या पदभरतीमध्ये इच्छुक उमेदवार हा स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे.

अंगणवाडी मदतनीस या पदाच्या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवार हा किमान १२ वी उत्तीर्ण आवश्यक आहे. वयाची अट १८ ते ३५ वर्ष असून विधवा साठी वयाची अट ही मात्र, ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. तसेच सेविकांची ५ पदे रिक्त असून यामध्ये मारेगाव अंगणवाडी केंद्र क्रमांक ३ खैरगांव, मेंढणी, लाखापूर, पाथरी या पाच अंगणवाडी केंद्राचा समावेश असल्यामुळे या रिक्त पदासाठी आज १ मार्च पासून १५ मार्च पर्यंत इच्छुक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवाराची अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय मारेगाव येथे सुट्टीची दिवस वगळून स्विकारली जाणार आहे.