Page

आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारीत ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’- उद्योगमंत्री उदय सामंत

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

नागपूर : विदर्भाला भरभरून नैसर्गिक साधन संपत्ती लाभली आहे. उद्योगासाठी येथे पोषक वातावरण आहे. स्थानिक आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ट्रायबल इंडस्ट्रीयल पार्क’ येत्या फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित करीत आहोत. उद्योगपूरक वातावरणाला चालना देत राज्यशासन उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विदर्भ विकास परिषदेत दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर व महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘विदर्भ विकास परिषदे’चे उद्घाटन श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. माजी खासदार अजय संचेती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दशरथी, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष निकेश गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील उद्योगांसाठी ४१ हजार कोटींचा निधी

राज्याचा सर्वांगिण औद्योगिक विकास भौगोलिक विभागनिहाय समतोल साधून होणे आवश्यक आहे. गेल्या तीन महिन्यात ७१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मंजुर झाले असून त्यापैकी ४१ हजार २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये येत आहेत. यामुळे ३२ हजार जणांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. विदर्भातील आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ट्रायबल इंडस्ट्रीयल पार्क’येत्या फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित होईल, असा विश्वास श्री. सावंत यांनी व्यक्त केला.
तरुण उद्योजकांना प्रोत्साहन

तरूण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने ५०० कोटींहून अधिक निधींची तरतूद केली आहे. ही रक्कम संपूर्ण खर्च करण्यास उद्योग विभागाचे प्राधान्य असेल. याकरिता शासनासह अन्य घटकांचीही महत्त्वाची भूमिका आहे. बँकांनी तरुण उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यास बॅंकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व आता बँकांद्वारे उद्योजकांना कर्ज नाकारण्याचे प्रमाण ४२ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर आल्याचेही त्यांनी सांगितले.